रत्नागिरी:- मद्यधुंद अवस्थेत एका तरुणावर धारदार सुऱ्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अंकुश सूर्यकांत मांडवकर याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी आरोपीच्या वतीने प्रसिद्ध वकील ॲड. भाऊ शेट्ये यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली.
ही घटना १० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतील मांडवी येथील भुते नाका परिसरात घडली होती. मुरुगवाडा येथे राहणारा फिर्यादी अरमान अब्दुल्ला इनामदार हा आपल्या घराकडे जात असताना आरोपी अंकुश मांडवकर याने त्याचा रस्ता अडवला होता. फिर्यादीने रस्ता सोडण्यास सांगितल्याचा राग मनात धरून, मद्याच्या नशेत असलेल्या आरोपीने “जागेवरून हलला तर तुला खल्लास करीन” अशी धमकी देत फिर्यादीच्या डोक्यावर, गालावर आणि खांद्यावर सुऱ्याने सपासप वार केले होते. या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर बी.एन.एस. कलम १०९, १२६(२), ३५१(३), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला होता.









