Thursday, June 25, 2026
spot_img
Home राजकीय महायुतीच्या बैठकीत मंत्री योगेश कदमांचा सदस्यांना शिस्तीचा डोस

महायुतीच्या बैठकीत मंत्री योगेश कदमांचा सदस्यांना शिस्तीचा डोस

आमदार किरण सामंत यांचीही नाराजी

रत्नागिरी:- पद हे मोठी जबाबदारी आहे. या पदाला न्याय देताना सर्व समावेक्षक काम करावे . वेळेच बंधन म्हणजे आपली शिस्त असते. पुढील पाच वर्षात प्रत्येकाने ही शिस्त व काम दाखवणे आवश्यक आहे. आज पहिल्याच बैठकीला अनेक सदस्य हे अर्धा-पाऊणतास उशिराने आल्याबद्दल राज्यमंत्री योगेश कदम यांनी सर्वच सदस्यांचे कान टोचले. यापुढे असा उशिर चालणार नाही असेही त्यांनी स्पष्ट करीत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नावाची औपचारिकरित्या घोषणा करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरीतील जयेश मंगल पार्क येथे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी पूर्वी शिवसेना महायुतीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. विधानसभेचे अधिवेशन सुरु असतानाही राज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार किरण सामंत हे अध्यक्षांची परवानगी घेऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. या बैठकीसाठी दहाची वेळ सर्व सदस्यांना देण्यात आली होती. मंत्री कदम व आ. सामंत हे बरोबर दहाच्या ठोक्याला मंगल कार्यालयात दाखल झाले. यावेळी दोन ते तीन सदस्य आणि जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री व आमदार यांनी तब्बल अर्धा ते पाऊणतास सर्व सदस्यांची वाट पाहीली. यावेळी ना. कदम आणि आ. सामंत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. जवळपास पाऊणतासाने या बैठकीला सुरुवात झाली. यावेळी काही आरामात सदस्य बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ना. कदम म्हणाले की, अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे. यावेळी त्यांनी रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच मंडणगड तालुक्याला न्याय देण्याचे काम शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केले असून, अस्मिता केंद्रे यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांच्याकर्ड तीन टर्मचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी निवड झालेल्या विलास चाळके हेही पक्षात व जि.प.मध्येही अनुभवी आहेत. पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्वपक्षासह सहकारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करायचे आहे. पालकमंत्री याठिकाणी चांगले काम करीत असून, त्यांना साथ देण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करायचे आहे. जि.प. बरोबरच पं.स.च्या पदाधिकाऱ्यांनी पहिल्या दिवसापासूनच जनतेला न्याय देण्याचे काम करायचे आहे. पद हे मोठी जबाबदारी आहे. या पदाला न्याय देताना सर्व समावेक्षक काम करावे अशा शुभेच्छा त्यांनी अध्यक्ष-उपाध्यक्षांना दिल्या.
यावेळी आ. किरण सामंत, माजी आमदार व शिवसेना नेते राजन साळवी, माजी आमदार संजय कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राहूल पंडीत, भाजपाचे प्रमोद अधटराव, राष्ट्रवादीचे अजय बिरवटकर व पदाधिकारी उपस्थित होते.

जवळचे उशिराने आल्याने रत्नागिरीतील सदस्यांबाबत आ. सामंत नाराज
रत्नागिरी तालुक्यातीलही जि.प. सदस्य अर्धा ते पाऊण तास उशिराने दाखल झाल्याबद्दल आ. किरण सामंत यांनी तीव्र नाराजी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्याकडे बोलून दाखवली. जवळचेच असे करत असतील तर कसे होणार असे आ. सामंत म्हणाले. त्यातच तालुकाप्रमुख आणि जि.प. सदस्य बाबू म्हापही अर्धा तास उशिराने या बैठकीला दाखल झाले.