गुहागर:- गुहागरमधील छत्रपती शिवाजी चौक येथील राहत्या घरून मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. वेड्याच्या भरात ते घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले असले, तरी अज्ञात व्यक्तीने अपहर केल्याच्या संशयावरून गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १४०(३) नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादी सुधाकर मधुकर सांगळे (वय ५७, रा. वरचापाट दुर्गादेवीवाडी, गुहागर) यांचे मित्र राजेंद्र बाळकृष्ण रहाटे यांचे बंधू महेंद्र बाळकृष्ण रहाटे (वय ४५, रा. छत्रपती शिवाजी चौक, गुहागर) हे मनोरुग्ण आहेत. ते २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कोणालाही काही न सांगता राहत्या घरातून अचानक निघून गेले.
कुटुंबीयांनी आणि मित्रांनी त्यांचा आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे कसून शोध घेतला, मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत. महेंद्र रहाटे हे मनोरुग्ण असल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांना गुप्तपणे व गैरपणे नेण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण केल्याची खात्री पटल्यामुळे फिर्यादीने पोलिसांत खबर दिली. या प्रकरणी रिक्षाचालक सुधाकर सांगळे यांच्या फिर्यादीवरून गुहागर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस बेपत्ता महेंद्र रहाटे यांचा शोध घेत आहेत.









