मच्छीमारांसमोर नवे संकट; खोल समुद्रातील जेलिफिश किनारपट्टीला

रत्नागिरी:- मतलई वार्‍यांमुळे खोल समुद्रातील जेलीफिश मासा रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीला दाखल झाला असून त्याचा फटका रापणीसह गिलनेटने मासेमारी करणार्‍यांना बसला आहे. जयगडपासून पुर्णगडपर्यंतच्या किनार्‍यावर जेलीफिश आढळून येत आहे.

गेल्या महिन्याभरात अपेक्षित मासळी मिळत नसल्याचे मच्छीमार त्रस्त झाले आहेत. बदलत्या वातावरणामुळे वारंवार वादळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा मासेमारी बंद ठेवावी लागली. यंदा हंगामाच्या सुरवातीपासून बांगडा मोठ्याप्रमाणात मिळत होता; मात्र फिशमिलच्या बांगड्याला 15 रुपये किलो तर खाण्यासाठीच्या बांगड्याला प्रतिकिलो चाळीस रुपये दर मिळत आहे. 120 ते 150 रुपये किलोने विकला जाणारा बांगडा माशाला कवडीमोलाचा दर मिळू लागल्याने मच्छीमारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. मतलई वारे वाहू लागल्यानंतर मोठा मासा मिळेल अशी अशा होती, परंतु अपेक्षित मासा मिळत नसल्याचे मच्छीमार सांगत आहेत. ट्रॉलिंग, पर्ससिननेटला विविध प्रकारची फिशमिलचा मासा मिळत आहे. काही नौकांना 500 किलोपर्यंत बला मासा मिळत आहे. त्याला 130 रुपये किलो दर मिळत आहे. किनार्‍यावर पाच ते दहा वावात मासेमारी करुन चरितार्थ चालविणार्‍या मच्छीमारांपुढे सध्या जेलीफिशचे संकट आवासून उभे ठाकले आहे. गेले आठ दिवस जयगडपासून पुर्णगडपर्यंतच्या किनारी भागात मोठ्याप्रमाणात जेलिफिश आला आहे. मतलई वार्‍यामुळे जेलिफिश किनारपट्टी भागात आल्याचे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. दोन दिवसांपुर्वी रत्नागिरी शहराच्या जवळ एका रापणीच्या जाळ्यात मोठ्याप्रमाणात जेलिफिश अडकला होता. हा मासा काढून टाकण्यासाठी पाण्यात जाळं उलटं करावे लागले. त्यामध्ये अन्य मासेही समुद्रात निघून गेले. सध्या समुद्रात गिलनेटने मासेमारी करणार्‍यांना याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मच्छीमार त्रस्त झाले आहेत. मोठ्याप्रमाणत जेलीफिश जाळ्यात असेल तर त्याचे नुकसान होते. सध्या म्हाकुळ मासा किनारी भागात मिळत आहे. एका नौकेला दहा ते वीस किलो मासा मिळतो. पण जेलिफिशमुळे हा मासा पुढे सरकत निघुन जाण्याची भिती वर्तविण्यात आली आहे.