मंगळूर एक्स्प्रेसमधून १५ लाखांच्या दागिन्यांची चोरी

कोकण रेल्वे प्रवासात महिलेची पर्स लांबवली

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या मंगळूर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेची पर्स चोरट्याने पळवली. त्यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३ डिसेंबर २०२४ ला पहाटे साडेचारच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशनजवळ आल्यावर धावत्या रेल्वेमध्ये घडली.

पोलिसांकडून

मिळालेल्या

माहितीनुसार, फिर्यादी नारायण रामराव सरदेसाई (वय ६१) हे व त्यांची पत्नी मंगळूर एक्स्प्रेसने मुंबई ते भटकळ- राज्य कर्नाटक असा प्रवास करत होते. रेल्वे खेडजवळ आल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पत्नीला झोप लागली. ३ डिसेंबरला पहाटे साडेचारच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन आल्यावर त्यांच्या पत्नीला लक्षात आले की, त्या झोपलेल्या ठिकाणी त्यांनी डोक्याखाली ठेवलेली पर्स आणि त्यातील दागिने व रोख रक्कम चोरट्याने पळवली. पर्समध्ये

४ लाखांचे एक हिऱ्याचे कानातले जोड, २ लाखांचे एक हिऱ्याचे मोठे मंगळसूत्र, ६० हजारांचे एक हिऱ्यांचे लहान मंगळसूत्र, १ लाखाची एक हिऱ्याची अंगठी, ३ लाख किमतीच्या २ बांगड्या, ३ लाखांची मोहन माळ, ३५ हजार रोख, १५ हजारांचा मोबाईल, दुसरा १५ हजारांचा मोबाईल असा १५ लाख २५ हजार रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्याने डल्ला मारला. याप्रकरणी नारायण सरदेसाई यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.