भाट्ये येथे भंगार चोरी करणाऱ्या संशयितास अटक

गोळप-शिरबांडवाडी येथून पाठलाग करुन पकडले

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील गोळप-शिरबांडवाडी येथे फिनोलेक्स कंपनीने ठेवलेले भंगार चोरून नेणाऱ्या मोटारीचा पाठलाग करून भाट्ये येथे पकडण्यात आले. संशयिताला अटक केली असून, त्याचे नाव आदेश गणेश पाटील (वय २०, रा. कोकणनगर, रत्नागिरी, मूळ गाव शिवारआंबेरे) आहे. त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी मात्र पलायन केले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत फिनोलेक्स कंपनीचे सुरक्षा अधिकारी रमेश मोहन कदम (वय ५७) यांनी याची फिर्याद पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. फिनोलेक्स कंपनीचे भंगारमध्ये ठेवलेले लोखंडी सामान हे गोळेप-शिरंबाडंवाडीमध्ये फिनोलेक्स कंपनीच्या मालकीचे जागेमध्ये ठेवण्यात आले होते. शुक्रवारी (ता.२४) रात्री पावणेनऊच्या सुमारास कंपनीच्या लॅण्डलाईनवर फोन आला. शिरंबाडवाडी येथे तुमचे कंपनीचे ठेवलेले लोखंडी भंगार कोणीतरी गाडीमध्ये भरून घेऊन जात आहे. तुम्ही ताबडतोब या. त्यामुळे कदम हे अशोक विलास पाटील व ऋषिकेश जगन्नाथ शिंदे, चालक प्रथमेश हरिश्चंद्र राडये यांच्यासह मोटारीने घटनास्थळी गेले. तिथे एक मोटार उभी होती. त्यामधील बसलेल्यांनी त्यांना पाहून गाडी सुरू करून रत्नागिरीच्या दिशेने पळून जाऊ लागले. या तिघांनीही मोटारीने त्यांचा पाठलाग केला व भाटये येथे गाडी थांबवली, मात्र गाडी थांबल्यानंतर गाडीतील तिघे जण अंधाराचा फायदा घेत पळून गेले, मात्र चालक आणि गाडी ताब्यात घेण्यात आली.

या गाडीच्या हौद्यामध्ये कंपनीचे चोरी करून आणलेले साहित्य होते. आदेश गणेश पाटील याला पळून गेलेल्यांची नावे विचारली असा त्यातील पळून गेलेल्यामधील एकाचे दीपक (पूर्ण नाव माहिती नाही) आणि अन्य दोघांची माहिती नसल्याचे आदेशने सांगितले. याप्रकरणी कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.