भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुणी जखमी

रत्नागिरीराजनगर येथील एटीएमसमोर भीषण अपघात

रत्नागिरी:- शहरातील राजनगर भागात बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसमोर एका भरधाव दुचाकीस्वाराने विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या तरुणीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणी जखमी झाली असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, अपघात करणारी चालक विनापरवाना आणि विनाकागदपत्रे गाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दिनांक २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद बाबल्या कांबळे हे कर्तव्यावर असताना हा अपघात झाला. पुजा प्रथमेश सोगम (वय ३२, रा. विनम्रनगर, रत्नागिरी) ही आपली होंडा ट्विस्टर गाडी (क्र. MH-09-BR-7250) घेऊन कोकणनगर ते चर्मालय या दिशेने जात होती.
राजनगर येथील एटीएमसमोर आला असता, त्यानी आपली दुचाकी अत्यंत भरधाव आणि धोकादायक रित्या चालवत विरुद्ध दिशेला (Wrong Side) नेली. यावेळी चर्मालय बाजूकडून आपल्या टीव्हीएस ज्युपिटरने (क्र. MH-08-BH-2286) येणाऱ्या रक्षा राजेश पुनसकर (वय १९, रा. कोकणनगर) हिला आरोपीने जोरदार धडक दिली. या धडकेत रक्षा पुनसकर ही तरुणी जखमी झाली आहे.

पोलीस तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. संशयित पुजा प्रथमेश सोगम याच्याकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता, दुचाकीला पुढील आणि मागील नंबर प्लेट नव्हती, वाहनाचा कोणताही विमा नव्हता.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी १ एप्रिल रोजी पहाटे दिड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१ आणि मोटार वाहन कायद्याच्या १८४, ३(१)/१८१, १४६/१९६, ५०/१७७ या कलमान्वये गुन्हा रजिस्टर नंबर ८३/२०२६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रत्नागिरी शहरात विनापरवाना आणि बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने पोलिसांनी अशा वाहनचालकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.