खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे ओव्हरब्रिजजवळ शुक्रवारी रात्री एका अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमित सूर्यकांत फावरे (वय ३७, रा. आवाशी माळवाडी, ता. खेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास अमित फावरे हे भरणे ओव्हरब्रिज परिसरातील मुंबई-गोवा हायवेवर होते. यावेळी मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनचालकाने आपले वाहन भरधाव वेगात आणि हलगर्जीपणे चालवून अमित यांना जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, अमित यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या अमित यांचा या अपघातात मृत्यू झाला.
याप्रकरणी मृत अमित यांचे वडील सूर्यकांत तुकाराम फावरे (वय ६५) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), १८४, १३४(अ), १३४(ब) या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे:









