Tuesday, July 21, 2026
spot_img
Home चिपळूण बेपत्ता महिलेचा विहिरीत आढळला मृतदेह

बेपत्ता महिलेचा विहिरीत आढळला मृतदेह

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील पालवण (ढोरपाल) येथील विहिरीत एका बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. १५ जुलैपासून ही महिला बेपत्ता होती, अखेर तीन दिवसांनंतर तिचा मृतदेह विहिरीत सापडला. या दुर्दैवी घटनेमुळे साठलेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका गजानन चव्हाण (वय ५२, रा. पालवण साठलेवाडी) या १५ जुलै २०२६ रोजी राहत्या घरून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्या घरी परतल्या नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, मात्र त्या मिळून आल्या नाहीत. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात ‘नापत्ता’ असल्याची नोंद (रजि. क्र. १०/२०२६) करण्यात आली होती.

दरम्यान, १८ जुलै रोजी ढोरपाल, पालवण येथील एका विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसून आला. हा मृतदेह प्रियांका चव्हाण यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

या प्रकरणी १८ जुलै रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अमृ. क्र. १३/२०२६) करण्यात आली असून, बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार पुढील कार्यवाही सुरू आहे. महिला विहिरीत कशी पडली किंवा त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.