बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंग; संशयितांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

रत्नागिरी:- बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरचा पर्दाफाश झाल्यानंतर या सेंटरमधुन कुठल्या देशात कॉल झाले याची माहिती पोलिसांनी मागवली आहे. या प्रकरणात मास्टर माईंड असलेल्या फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) याच्या वांद्रे येथील कार्यालयावर रत्नागिरी पोलिसांनी छापा टाकल्याची माहिती पुढे आली आहे. या कारवाईत पोलिसांच्या हाती महत्वाचे दस्तऐवज लागण्याची शक्यता असून फैजल याच्या पनवेल निवस्थांनी देखील अशाच प्रकारची धाड टाकून घराची झडती घेण्यात आली. पोलिसांनी मिळवलेला दस्तऐवज आणि संबधीत कंपनीने कॉल रेकॉर्ड दिल्यानंतरच या प्रकरणाची पुढील दिशा निश्चित होणार आहे. दरम्यानअटकेतील दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दहशतवादी विरोधी पथकाच्या रत्नागिरी शाखा आणि शहर पोलिसांनी शुक्रवारी देशाच्या सुरक्षेसंदर्भातील हे गंभीर प्रकरण उघडकीस आणले. महिनाभरापूर्वीच हे सेंटर शहरातील आठवडा बाजार येथे एक मोबाईल शॉपीमध्ये सुरू झाले. त्यातूनयामध्ये गेल्या महिनाभरात १०० आंतरराष्ट्रीय कॉल झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल )अॅड्रेसवरून दुसऱ्या आयपी अॅड्रेसवर कॉल केला जातो. त्यावर देशाच्या संरक्षण यंत्रणेचे पुर्ण लक्ष असते. मात्र जी नियमावली (प्रोटोकॉल) ठरली आहेत, त्या निमांना बगल देऊन काही कॉल होत आहेत, याची माहिती मिळाल्यानंतर हा प्रकार पुढे आला आहे.  

यामध्ये कोणत्या देशात कॉल केला आहे, त्यावरून त्याचे दर ठरलेले असतात. त्याचा महसुल थेट शासनाला मिळतो. मात्र शासनाची परवनागी न घेता हे सेंटर सुरू असल्याचे तपासात पुढे आले आहे. बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल आणि शासनाचा महसूल बुडविणे, या दोन्ही गुन्ह्यामध्ये संशयित म्हणून श्रीटेकचे मालक अलंकार अरविंद विचारे (रा. छत्रपतीनगर रत्नागिरी) आणि या प्रकरणातील मास्टर माईंड फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) यांना अटक केली होती. दोघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ३ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी येथील दहशतवादी विरोधी पथक मुंबईला रवाना झाले आहे. या प्रकरणातील मास्टर माईंड फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी याच्या वांद्रे येथील कॉल सेंटरची झाडाझडती रत्नागिरी पोलिसांनी घेतल्याची माहिती पुढे आली असून फैजल याच्या पनवेल येथील निवस्थांनीदेखील अशीच झाडाझडती झाल्याचे समजते. दरम्यान या सेंटरवरून देशाची सुरक्षितता धोक्यात येणारे काही कॉल झाले आहेत का, याची प्रमुख्याने तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कॉल लिस्ट मागविण्यात आली आहे. यावरून या प्रकरणाच्या तपासाची दिशा ठरणार आहे. दरम्यान संसयितांनी सेंटरसाठी शासनाची परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.