रत्नागिरी:- ‘ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केली, त्यांना जनतेने निवडणुकीत घरी बसवले आहे,’ असा थेट टोला मारत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत विविध राजकीय घडामोडींवर बोलताना योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण आणि वैभव नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
२०१९ मध्ये फक्त मुख्यमंत्री होण्यासाठीच प्रयत्न
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा समाचार घेताना योगेश कदम म्हणाले, “२०१४ मध्ये महायुतीचे आकडे कमी पडले म्हणून उद्धव ठाकरेंना संधी मिळाली नाही; अन्यथा त्यांनी त्याच वेळी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली असती. २०१९ मध्ये आकडे जुळून आल्याने त्यांनी ती अंमलबजावणी केली. उद्धव ठाकरे यांची पहिल्यापासून युतीची मानसिकता नव्हतीच, फक्त ‘मी कसा मुख्यमंत्री होईल’ यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू होते. स्वतः काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसायचे आणि आमच्यावर आरोप करायचे, हा त्यांचा दुटप्पीपणा आहे.”
रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेनेची इच्छा पूर्ण
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर भाष्य करताना कदम म्हणाले, “पालकमंत्री पदात कोणाचा पुढाकार होता यावर मला भाष्य करायचे नाही. मात्र, रायगडमध्ये शिवसेनेची ताकद सर्वात जास्त आहे आणि तेथे शिवसेनेचाच पालकमंत्री व्हावा ही आमची इच्छा होती, ती आता पूर्ण झाली आहे. रायगडमधील शिवसैनिकांना अखेर न्याय मिळाला आहे. आता यावर राजकारण न करता भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या विकासकामांवर भर दिला पाहिजे. भरत शेठ हे तळागाळातील समस्यांची जाण असलेले नेतृत्व असून विकासकामांत कोणतीही दिरंगाई होणार नाही.”
ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करताना योगेश कदम म्हणाले, “नाईक हे आमचे मित्र आहेत, पण पराभवाची खरी कारणे आम्हाला आणि ठराविक लोकांनाच माहिती आहेत. त्यांनी उघडपणे खरे बोलावे, निष्कारण ‘गद्दार’ या शब्दाचा प्रयोग करू नये. तुम्ही जर प्रामाणिक असता, तर जनतेने तुम्हाला नक्कीच निवडून दिले असते. ज्यांनी प्रामाणिक राहून शिवसेना वाचवली, त्यांच्यावर जनतेने विश्वास दाखवला आणि ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, त्यांना जनतेने घरी बसवले त्यातलेच एक वैभव नाईक आहेत असा आरोप त्यांनी कीेाल.









