चिपळूण:- चिपळूण विशेष न्यायालयाने एका अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या ३२ वर्षीय नराधमाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फईम अब्दुल्ला तांबे (रा. चिपळूण) असे दोषी आरोपीचे नाव असून, या महत्त्वपूर्ण निकालामुळे पिीडत बालकाला न्याय मिळाला आहे.
९ जानेवारी २०१९ रोजी संध्याकाळी पीडित आठ वर्षाचा मुलगा खेळत असताना आरोपी फईम तांबे याने त्याचे तोंड व हात रुमालाने बांधून त्याला शेतात नेले आणि त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ११ जानेवारी २०१९ रोजी पुन्हा एकदा आरोपीने त्याला जवळच सुरू असलेल्या एका इमारतीत नेऊन बळजोरी करत अनैसर्गिक अत्याचार केला आणि पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली.
अखेर पीडित मुलाच्या मित्राने ही हकीकत त्याच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर, नातेवाईकांनी चिपळूण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध भा.द.वि. कलम ३७७, ३६३, ५०६ आणि पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
चिपळूण विशेष न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले; ज्यामध्ये पीडित मुलगा आणि त्याचे मित्र यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता श्री. प्रफुल्ल रामचंद्र साळवी यांनी काम पाहिले, तर तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.आय. नाईकवाडे यांनी केला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष न्यायाधीश श्री. डी. बी. म्हालटकर यांनी आरोपी फईम तांबे याला भा.दं.वि. आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि १०,००० रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. लहान मुलांवरील अत्याचार अत्यंत गंभीर असून अशा गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा होणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने यावेळी नमूद केले.









