गुहागर:- गुहागर तालुक्यातील मळण, पाखाडवाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भिंतीवरून पडून ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नरेश नारायण पाष्टे (वय ३४, रा. खामशेत पाष्टेवाडी) असे मयताचे नाव असून, ही घटना २८ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत नरेश पाष्टे हे दिलीप सदानंद आग्रे यांच्या घराच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी गेले होते. तिथे सुरू असलेल्या पडवीच्या भिंतीवर चढून लोखंडी अँगलचे माप घेत असताना, अचानक त्यांचा तोल गेला. यामुळे ते भिंतीच्या बाहेरील बाजूस असलेल्या पाण्याच्या कोरड्या वहाळामध्ये सुमारे ८ फूट उंचीवरून खाली पडले.
या दुर्दैवी अपघातात नरेश यांच्या अंगावर व छातीवर बांधकामाचे जड चिरे पडले. यात त्यांना छातीला व पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने औषधोपचारासाठी श्रृंगारतळी येथील प्रो-लाईफ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून (क्रमांक १८/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४) पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे पाष्टेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









