बसरा जहाजाचा मुक्काम पाऊस संपेपर्यंत वाढणार

अमावस्येच्या उधाणात जहाजाचे प्रचंड नुकसान

रत्नागिरी:- बसरा स्टार एजन्सीचे भरकटुन मिर्‍या किनार्‍याला लागलेले इंधनवाहू जहाज किनार्‍यावर पुरते बसले आहे. आमावस्येच्या उधाणाच्या तडाख्यात जहाजाचे नुकसान झाले आहे. जहाज काढण्याबाबत एजन्सीकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याने त्याना चार दिवसाचा अल्टीमेटम दिला असला तरी पावसाळ्यात जहाज काढणे शक्य नसल्याने जहाजाचा मुक्काम पाऊस संपेपर्यंत वाढणार आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात हे जहाज भरकटुन मिर्‍या किणार्‍यावर लागले आहे. दीड महिना झाले तरी जहाज काढण्याबाबत एजन्सीकडून अपेक्षित गती दिसत नाही. आमावस्येच्या भरतीमुळे उठणार्‍या अजस्र लाटांचा मारा जहाज सोसत आहे. त्यामध्ये जहाज चेपूण, फाटून त्याची दयनिय अवस्था झाली आहे. जहाजामध्ये पाणी भरून केबिन असलेल्या भागा किनार्‍यावर रुतला आहे. त्यामुळे जहाज हेलकावे खावून बंधार्‍याला आदळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

दरम्यान या जहाजामध्ये असलेल जळके ऑईल आणि 25 हजार लिटर डिझेल गळतीचा किनार्‍याला धोका होता.मात्र भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी, जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी आदींनी चार से सहा दिवसाची मोहिम आखुण जहाज इंधनमुक्त केले आहे.

प्रादेशिक बंदर विभागाने जहाजाच्या एजन्सीला यापूर्वीही नोटीस बजावली होती. त्यानुसार किनारा सुरक्षेबाबत तत्काळ पावले उचलण्यात आली. जहाज इंधनमुक्त झाल्यानंतर आता दुसरे नोटिस बंदर विभागाने एजन्सीला दिले आहे. त्यासाठी चार दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. चार दिवसात जहाज भंगारात काढा किंवा किनार्‍यावर दुरूस्त करून ओढून नेण्याबाबत निर्णय घ्यावा, असे नोटिस बजावल्याचे श्री. उगलमुगल यांनी सांगितले.