जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव; जागा भाडेतत्वावर देणार
रत्नागिरी:- महिला बचत गटांनी बनवलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बंद प्राथमिक शाळांच्या इमारती, मोकळ्या जागा या भाडे तत्त्वावर दिल्या जाणार आहेत. त्या-त्या गावातील बचत गटांनी आपले प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितींकडे द्यावेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केले.
ग्रामीण जीवनन्नोती अभियानांतर्गत समुदाय प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, सभापती चंद्रकांत मणचेकर, महिला व बालकल्याण सभापती रेश्मा झगडे, प्रकल्प संचालक श्रीमती घाणेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थिती असलेल्या करबुडे येथील हिरकणी महिला बचत गटाच्या सदस्यांनी मते मांडतानाच जीवनन्नोती अभियानातून महिला कसा फायदा झाला याची माहिती दिली. तसेच मार्केटींगची गरज असल्याचे मतही त्यांनी मांडले.
अध्यक्ष विक्रांत म्हणाले की, महिला बचत गटाचे काम चांगल्या पध्दतीने सुरु आहे. महिलांनी स्वतःच्या पायावर हिमतीने उभे राहणे आवश्यक आहे. बचत गटाच्या मालाला बाजारपेठ मिळवून देेण्यासाठी गावातल्या गावातील उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेने उत्पन्न वाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या ठिकाणी बचत गटांना विक्री स्टॉलसाठी जागा देण्यात येणार आहे. बांधकाम विभागाच्या निकषानुसार हे गाळे भाड्याने दिले जातील. तसेच ज्या ठिकाणी मोकळ्या जागा आहेत, तेथे गाळे बांधून तेही उपलब्ध करुन दिले जातील.
याप्रसंगी उपाध्यक्ष बने यांनी समुदाय प्रशिक्षण केंद्राची इमारतीला जोडून निवासासाठी दुसरी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.









