रत्नागिरी:- शहरातील बंदररोड फडकेवाडा येथील कॉग्रेसभुवन वळणावर दुचाकीने महिलेच्या दुचाकीला धडक दिली. या मध्ये महिला जखमी झाली. जखमी स्थितीत सोडून दुचाकी स्वाराने पलायन केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ११ एप्रिलला दुपारी तीनच्या सुमारास बंदररोड फडकेवाडा येथून कॉग्रेसभुवनकडे येणाऱ्या युटर्न रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी महिला सौ. उमा रमेश गावखडकर या दुचाकी (क्र. एमएच-०८ एएस ३४६५) घेऊन फडकेवाडा येथून कॉंग्रेसभुवनकडे जाण्यासाठी वळत असताना कॉग्रेसभुवन येथील बंदररोडकडे जाणाऱ्या अज्ञात दुचाकी स्वाराने निष्काळजीपणे दुचाकी चालवून गावखडकर यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला, पायाला, डोळ्याखाली, नाकाला दुखापत झाली. अपघात घडताच संशयित स्वाराने पलायन केले. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









