पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचा गलथान कारभार सुरूच 

रत्नागिरी:- शहरात वितरित केल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत प्रशासनाने इशारा देऊनही अजूनही दर्जाबाबत ओरड सुरू आहे. शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या गुरूकूल येथे विद्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये अळी सापडल्याचे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालिका प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. या घटनेनंतरही पुरवठादार एजन्सीला काही फरक पडलेलेला नाही. आजच्या पोषण आहाराचाही दर्जा सुमार होता. तसा अभिप्राय तपासणीसाठी असलेल्या शिक्षकांनी दिला आहे.

यापूर्वी शाळेत बचतगटांच्या माध्यमातून आहार शिजवून दिला जात होता. केंद्र व राज्य सरकारने या योजनेत बदल केला. शहरी भागात सेंट्रल किचनच्या माध्यमातून पोषण आहार दिला जात आहे. शहरातील शाळांसाठी जिल्हाबाहेरून ३ बड्या गटांनी टेंडर भरले. त्यानंतर या तिन्ही गटांना शाळा विभागून देण्यात आल्या; मात्र पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहाराचा फज्जा उडाला.

पहिल्या दिवशी शहरातील शिर्के प्रशालेत कच्चा भात आणि बेचव वरण देण्यात आले. दुसऱ्या दिवशी दामले शाळेमध्ये उशिरा आहार पोहचला. त्यामुळे मुले भुकेने व्याकूळ झाली होती. एवढे सर्व होऊनही पटवर्धन हायस्कूलच्या गुरूकूलमध्येही असाच धक्कादायक प्रकार उघड झाला. एका विद्यार्थ्याच्या थाळीमध्ये पोषण आहारात अळी सापडली. त्याने हा प्रकार शिक्षकांना दाखवला. शिक्षकांनी याची कल्पना मुख्याध्यापकांना दिली. अळी सापडल्याची रितसर तक्रार शाळेने पालिका प्रशासनाकडे केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे याबाबतची तक्रार करण्यात आली. संबंधित ठेकेदाराला नोटीस दिली असून त्यांना सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्यात आली. यापुढे ठेकेदाराबाबत तक्रार आल्यास संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करू, असा इशारा डॉ. जाखड यांनी दिला होता. या गंभीर प्रकारानंतर आज पटवर्धन हायस्कूलमध्ये जिल्हा परिषद आणि पालिका प्रशासन अधिकार्‍यांची विविध पथके शहरातील शाळांमध्ये पाहणी करण्यासाठी दाखल झाली. भात आणि डाळ  विद्यार्थ्यांना आहारामध्ये देण्यात आली होती. सर्वांनी त्याची चव चाखली. तेव्हा डाळीचा दर्जा सुमार असल्याचे सांगण्यात आले. तसा अभिप्राय शाळेकडून पालिका प्रशासनाला देण्यात येणार आहे.