Friday, May 29, 2026
spot_img
Home चिपळूण पेठमाप येथे आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

पेठमाप येथे आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

चिपळूण:- चिपळूण शहरातील पेठमाप येथील शिवनेरी चौक परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पेठमाप, शिवनेरी चौक येथे राहणारे प्रेमनाथ पांडुरंग देवळेकर (वय ७६) हे नेहमीप्रमाणे नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या पाण्याच्या टाकीच्या स्टँडजवळ त्यांना एक अनोळखी पुरुष जमिनीवर झोपलेल्या स्थितीत दिसून आला.

संशय आल्याने देवळेकर यांनी जवळ जाऊन पाहिले असता, त्या व्यक्तीची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यांनी त्या व्यक्तीला हलवून पाहिले, मात्र शरीर ताठर आणि थंड पडले होते. श्वासोच्छवास पूर्णपणे बंद असल्याने तो इसम मयत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे असून, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात २७/२०२६ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.