पुतण्याला दगड का मारता विचारल्याचा रागातून वडिलांसह मुलीला बेदम मारहाण

राजापूर:- पुतण्याला दगड मारण्याबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने ५३ वर्षीय व्यक्तीसह त्यांच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी आणि बांबूच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना राजापूर तालुक्यातील सोलगाव येथे घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश नारायण डोंगरे (वय ५३, रा. राजापूर) हे ६ एप्रिल रोजी सकाळी ८.१५ च्या सुमारास सोलगाव गांगो मंदिराजवळून आपल्या पत्नीशी फोनवर बोलत घरी जात होते. आदल्या रात्री (५ एप्रिल) फिर्यादींचा पुतण्या गणेश हा दारू पिऊन घरी जात असताना आरोपी रोहित वसंत गुरव (वय २७) हा त्याला मागून दगड मारत होता. त्यावेळी फिर्यादींनी “कोण ते दगड मारतात” असे विचारले होते.

​या विचारणेचा राग मनात धरून आरोपी रोहित गुरव याने सोमवारी सकाळी महेश डोंगरे यांना गाठले. त्याने डोंगरे यांना अडवून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि त्यांची मान पकडून त्यांना जमिनीवर पाडले. त्यानंतर त्याने डोंगरे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

​वडील मार खात असल्याचे पाहून त्यांची मुलगी त्यांना सोडवण्यासाठी धावून आली. तिने आरोपीला “माझ्या पप्पांना का मारतोस?” असे विचारले असता, आरोपीने तिलाही जोरात ढकलून दिले. या धक्काबुक्कीत ती खाली पडल्याने तिच्या उजव्या हाताला आणि पायाला मुका मार लागला आहे.
​एवढ्यावरच न थांबता, आरोपी रोहितने तेथे असलेली बांबूची काठी उचलून महेश डोंगरे यांच्या पाठीवर आणि कमरेवर सपासप वार केले. “तुला मारून टाकीन आणि खड्ड्यात पुरून टाकीन,” अशी धमकीही त्याने यावेळी दिली.

​या मारहाणीत महेश डोंगरे गंभीर जखमी झाले असून त्यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी रोहित वसंत गुरव याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.