Saturday, October 10, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पाली मराठवाडी येथे भरदिवसा घरफोडी

पाली मराठवाडी येथे भरदिवसा घरफोडी

चोरट्यांनी कपाटातून लांबवले पावणेसात लाखांचे सोने-चांदीचे दागिने

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली मराठवाडी येथे भरदिवसा घरफोडीची एक धाडसी घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील तब्बल ६ लाख ८० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, फिर्यादी मीनाक्षी अविनाश जाधव (वय ४५, रा. पाली मराठवाडी, ता. जि. रत्नागिरी) या बुधवारी, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा ते पावणेदोनच्या सुमारास गावातील आठवडा बाजार असल्याने भाजीपाला व घरातील जिन्नस खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. घरामध्ये कोणी नसल्याची नेमकी संधी साधून पाळत ठेवलेल्या अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील लोखंडी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आतील दरवाजाचे बिजागर तोडून बेडरूममध्ये प्रवेश करत लोखंडी गोदरेज कपाटाचे लॉकर उचकटले. त्या लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे ४ लाख १५ हजार रुपये किमतीच्या ५ तोळे वजनाच्या सोन्याच्या प्लेन पाटल्या, ७० हजार रुपयांचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे वळे, ६० हजार रुपयांची पांढऱ्या खड्याची सोन्याची अंगठी, ७० हजार रुपयांचे सोन्याच्या वाट्या व मणी असलेले दोन पदरी मंगळसूत्र, गुलाबी खडा असलेला सोन्याचा बदाम, ३२ हजार रुपयांच्या सोन्याच्या रिंगा, १६ हजार रुपयांची सोन्याची वेल, नाकातील सोन्याची नथ आणि ७ हजार रुपयांचे चांदीचे पैंजण व जोडवी असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मौल्यवान ऐवज लंपास केला.

भाजी खरेदी करून घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा तोडलेला आणि कपाटातील लॉकरमधील दागिने गायब असल्याचे मीनाक्षी जाधव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, भरदिवसा घडलेल्या या मोठ्या घरफोडीमुळे संपूर्ण पाली परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे; पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.