सिमेंट ब्लॉकला धडक लागल्याने घडली दुर्घटना; मृत चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी-हातखंबा मार्गावर पानवल येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. जयसूर्या शांताराम मांडवकर (रा. कापडगाव, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव असून, तो स्वतःच चालवत असलेली दुचाकी सिमेंट ब्लॉकवर आदळल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पानवल येथील मलुष्टे यांच्या बागेसमोर घडली. जयसूर्या हा आपल्या ताब्यातील होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. MH-08-AY-2007) घेऊन रत्नागिरीकडून हातखंबाच्या दिशेने जात होता. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी भरधाव वेगात चालवत असताना, त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला.
भरधाव वेगातील दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट ब्लॉकवर जोरात जाऊन आदळली. या भीषण अपघातात जयसूर्या याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. दुचाकीचा वेग जास्त असल्याने हा अपघात प्राणघातक ठरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रुपेश रघुनाथ भिसे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी मृत आरोपी जयसूर्या मांडवकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.









