पाणीटंचाई आराखड्यात ३४३ गावे, ८१४ वाड्यांचा समावेश

टंचाई निवारणासाठी ११.७० कोटींची तरतूद

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ११ कोटी ७० लाख ७८ हजार रुपयांचा ‘पाणीटंचाई कृती आराखडा’ तयार केला आहे. या आराखड्यांतर्गत जिल्ह्यातील ३४३ गावे आणि ८१४ वाड्यांना दिलासा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मार्च ते जून या कालावधीत अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणीपातळी खालावते. अशा परिस्थितीत दुर्गम वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे किंवा तात्पुरत्या नळ योजना राबवणे अनिवार्य असते. पाणी टंचाई आराखड्यात जिल्ह्यातील ३४३ गावे आणि ८१४ वाड्या प्रभावित आहेत. या गावे आणि वाडीतील टंचाई निवारणास ११ कोटी ७० लाख ७८ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. मार्च २०२६ ते जून २०२६ पर्यंत या कालावधीत टंचाई निवारणासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.

प्रशासनाने या आराखड्यात केवळ टँकरवर अवलंबून न राहता विविध पर्यायांचा विचार केला आहे. यामध्ये प्रामुख्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा या पर्यायाचा विचार करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे आटले आहेत, तिथे टँकरद्वारे पाणी पोहोचवले जाईl. याशिवाय विंधन विहिरींची दुरुस्ती देखील हाती घेण्यात येणार आहे. जुन्या कूपनलिका आणि विहिरींची दुरुस्ती करून त्या कार्यान्वित करण्यावर भर दिला जाईल. टंचाईग्रस्त भागात तातडीने पाणी पोहोचवण्यासाठी तात्पुरत्या पाइपलाइन टाकण्याचे नियोजन आहे. खाजगी विहिरी अधिग्रहित करून त्यातील पाण्याचा वापर सार्वजनिक पुरवठ्यासाठी केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व संबंधित विभागांना (जसे की जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग आणि भूजल सर्वेक्षण विभाग) सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला असून, लवकरच या निधीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू होईल