‘सद्गुरु गॅस सेवा’ केंद्रावर छापा; पुरवठा विभागाची मोठी कारवाई
पाचल:- राजापूर तालुक्यातील पाचल येथे घरगुती गॅस सिलेंडरची अनधिकृत विक्री आणि काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजापूर पुरवठा विभागाने बुधवारी ‘सद्गुरु गॅस सेवा’ या सर्व्हिस सेंटरवर धाड टाकून तब्बल १०९४ ग्राहक कार्ड आणि सिलेंडर्स जप्त केले आहेत. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानात ग्राहकांची गॅस कार्ड्स जमा करून घेतली जात होती. या कार्ड्सचा वापर करून परस्पर सिलेंडर बुक केले जायचे आणि ते चढ्या दराने विकले जात होते. अनेक ग्राहकांच्या नावावर सिलेंडरची उचल होऊनही प्रत्यक्षात त्यांना गॅस मिळत नव्हता. गॅस टंचाईचा फायदा घेत हा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने हे पाऊल उचलले.
१ एप्रिल रोजी दुपारी १.३० च्या सुमारास पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यात १०९४ ग्राहकांची गॅस कार्ड्स जी अनधिकृतपणे दुकानात साठवून ठेवली होती. एक व्यावसायिक सिलेंडर जप्त करण्यात आला. सर्व जप्त मुद्देमाल सध्या राजापूर पुरवठा विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या प्रकरणाबाबत सर्व्हिस सेंटरचे संचालक विलास भिकू कोलते (रा. रायपाटण) यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “आम्ही गेली ४० वर्षे सेवा देत आहोत. ग्राहक स्वतःहून आपली गॅस पुस्तिका आमच्याकडे विश्वासाने ठेवून जातात.”
ही कारवाई राजापूर पुरवठा निरीक्षक निलेश लाड, पाचल मंडळ अधिकारी सौ. पूनम गावित, तलाठी नरके, शशिकांत कांबळे, विक्रम पाटील, कृष्णा गोरड, अमित चिले आणि पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे यांच्या पथकाने यशस्वी केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गॅस एजन्सींशी संबंधित कनेक्शनचे ट्रान्सफर आणि बुकिंग प्रक्रियेतही काही गैरप्रकार आहेत का, याचा तपास पुरवठा विभाग करत आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.









