Tuesday, May 26, 2026
spot_img
Home राजापूर अनुस्कुरा घाटात सिमेंटचे पत्रे वाहतूक करणारा ट्रक पलटी

अनुस्कुरा घाटात सिमेंटचे पत्रे वाहतूक करणारा ट्रक पलटी

चालकाविरोधात गुन्हा दाखल

पाचल:- अनुस्कुरा घाटातील पांगरी गावाजवळ रविवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सिमेंट पत्रे वाहतूक करणारा १४ चाकी भारत बेन्झ ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी रायपाटण पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक येथून पाचलकडे येणारा के.ए. १६ सी-७०१५ क्रमांकाचा ट्रक अनुस्कुरा घाटातील वळणावर वेग आणि अतिलोडमुळे चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाला. ट्रकमध्ये सिमेंट पत्रे भरलेले होते. अपघातात ट्रकचे नुकसान झाले असून, मागील भागातील सिमेंट पत्रे रस्त्याच्या कडेला पडून फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी चालक शोहैब जमीर बाशा (वय २६, रा. बडावणे, ता. चलकेरे, जि. चित्रदुर्ग, कर्नाटक) याच्याविरोधात निष्काळजीपणे व भरधाव वेगात वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच रायपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून पुढील तपास कमलाकर पाटील करत आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.