गुहागर:- जमातीची वर्गणी देण्यास उशीर झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका महिलेला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण व ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तीन आरोपींना गुहागर न्यायालयाने दोषी ठरवून कारावास व दंडाच्या शिक्षेची सुनावणी केली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गुहागर यांनी हा निकाल दिला.
तालुक्यातील पांगारी तर्फ हवेली येथील रहिवासी जरीना सिद्दीक दळवी (४७) यांच्या घरी १ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी आरोपी गुलामगौस दाऊद दळवी, अताऊल्ला दाऊद दळवी आणि सिराज हुसेन दळवी हे जमातीची वर्गणी मागण्यासाठी गेले होते. यावेळी दळवी यांनी ‘माझ्याकडे सध्या वर्गणी देण्यासाठी पैसे नाहीत, मी मागाहून देते’ असे सांगितले. याचाच राग मनात धरून आरोपी खाडीवर जात असताना त्यांनी जरीना दळवी यांना पाहून शिवीगाळ केली. तसेच तिन्ही आरोपींनी फिर्यादीच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला व ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला. तपासिक अंमलदार एच. आर. नलावडे यांनी आरोपींना ४ मे २०२० रोजी अटक करून न्यायालयात सबळ पुराव्यांसह दाखल केले.
न्यायालयात अभियोग पक्षाच्या वतीने सरकारी वकील एस. पी. कदम यांनी सादर केलेले पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून मुख्य आरोपी गुलामगौस दाऊद दळवी याला ३ महिने साधा कारावास व ३०० रुपये दंड, दंड न भरल्यास १० दिवसांचा साधा कारावास, दुसरा आरोपी अताऊल्ला दाऊद दळवी यास ३ महिने साधा कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १० दिवसांचा साधा कारावास, तिसरा आरोपी सिराज हुसेन दळवी यास ६ महिने साधा कारावास व १००० रुपये दंड, दंड न भरल्यास २० दिवसांचा साधा कारावास त्याचबरोबर आरोपी अताऊल्ला दळवी व सिराज दळवी यांना ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ४ दिवसाचा साधा कारावास अशी गुहागर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. व्ही. कपाडीया यांनी शिक्षा सुनावली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पैरवी अंमलदार म्हणून यु. वाय. मोनये यांनी काम पाहिले, तर आरोपींच्या वतीने ॲड. सुधीर बुटाला यांनी युक्तिवाद केला.









