Thursday, May 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी पर्यटन हंगामात जिल्ह्यात इंधन तुटवडा

पर्यटन हंगामात जिल्ह्यात इंधन तुटवडा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सध्या इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एप्रिल आणि मे महिना हा पर्यटनाचा मुख्य काळ असल्याने जिल्ह्यात वाहनांची वर्दळ वाढली आहे, मात्र त्याच वेळी मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचे तुटवडा जाणवत आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला प्रामुख्याने मिरज आणि हजारवाडी येथील डेपोमधून इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा होतो. जिल्ह्याची दैनंदिन गरज भागवण्यासाठी दररोज साधारण ६० ते ७० टँकर्सची आवश्यकता असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या डेपोमधून पुरेशा प्रमाणात टँकर येत नसल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.
सध्या लग्नसराई आणि मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. त्यामुळे इंधनाची मागणी नेहमीपेक्षा १० ते २० टक्क्यांनी वाढली आहे. मागणी वाढलेली असताना पुरवठा मात्र कमी झाल्याने जिल्ह्यातील अनेक पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल शिल्लक नसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांसह बाहेरून आलेल्या पर्यटकांचेही हाल होत आहेत.

इंधन मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावरही याचे वाईट परिणाम होत आहेत. अनेक पर्यटकांना आपली पुढची सफर रद्द करावी लागत आहे. जर येत्या दोन-तीन दिवसात मिरज आणि हजारवाडी डेपोतून इंधन पुरवठा सुरळीत झाला नाही, तर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.