परशुराम घाटात चारचाकीचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक संजय भंडारी (वय २८, रा. कांची, ता. नाशिक) हा आपल्या मित्रांसह महेंद्र हा एक्सयूव्ही ३०० या कारने गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी निघाला होता. परशुराम घाट परिसरात आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाली.

या अपघातात रोहित संतोष भालेकर (वय २८, रा. इंदिरानगर, नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा संपत आव्हाड (वय ३३, रा. चापडगाव, ता. निफाड), संदीप चंद्रभान डेरिंगे (वय ३६, रा. पळसे, नाशिक) तसेच चालक प्रतीक भंडारी हे जखमी झाले. जखमींना तत्काळ चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र, चिपळूण येथील पथकाने काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलीस उपनिरीक्षक इर्शाद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल खोंदल व नटे यांनी बचावकार्य केले. अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुढील तपास खेड पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.