परतीच्या पावसाचा भातशेतीला दणका

रत्नागिरी:- परतीच्या मुसळधार पावसाने भातशेतीला दणका दिला आहे. शनिवारी सांयकाळपासून सुरु झालेला पाऊस रविवारीही होता. त्यामुळे कापलेलं भात मळ्यात साचलेल्या पाण्यावर तरंगत आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास शेतीचे मोठे नुकसान होईल अशी भिती शेतकरी व्यक्त करत आहेत.

रविवारी (ता. 11) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 11.21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 3.40, दापोली 2.80, खेड 22.40, गुहागर 3.60, चिपळूण 8.80, संगमेश्‍वर 15.80, रत्नागिरी 22.80, लांजा 8.30, राजापूर 13 मिमी पाऊस झाला. 1 जुनपासून आजपर्यंत सरासरी पावसाची नोंद 2,672 मिमी आहे. हवामान विभागाकडून 14 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा इशारा दिलेला होता.

गेले आठ दिवस पावसाने उघडीप दिल्याने भातकापणी वेगाने सुरु होती. शनिवारी सकाळी अचानक सुरु झालेल्या पावसाने शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. अनेकांनी भात तसेच शेतात ठेवले होते. रात्रभर पडलेल्या पावसाने भात पूर्णतः भिजून गेले. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी हलका पाऊसही पडत होताच. त्यामुळे शेतकर्‍यांना ते गोळा करणे शक्य झाले नाही. रविवारी दुपारपासून पाऊस सुरु झाल्याने पुन्हा भातशेती पाण्यातच राहिली आहे. काही ठिकाणी लोंब्या काळ्या पडल्या असून त्या कुजण्याची शक्यता आहे. ऐन कापणी पावसाने गोंधळ घातल्याने चाळीस टक्के कापण्या रखडल्या आहेत. त्यापाठोपाठ गरव्या, निमगारव्या भाताची कापणीही संकटात सापडली आहे. त्यातील काही शेतं पावसामुळे आडवी झाली आहेत. दोन दिवसात झालेल्या सततच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. या नुकसानीमुळे भाताच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.