खेड:- नेत्रावती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या चार दक्षिण भारतातील चौघांनी खेड येथील एका प्रवाशाला बसण्याच्या जागेवरून बेदम मारहाण केल्याचा प्रकार आज पनवेल येथील रेल्वे स्थानकात घडला.
मारहाण झालेल्या त्या प्रवाशाने खेड येथील आपल्या नातेवाइकांना फोनवरूनच घटनेची माहिती दिली. दुपारी नेत्रावती एक्स्प्रेस खेडस्थानकात आल्यानंतर त्या नातेवाइकांनी संबंधित चार प्रवाशांना जाब विचारला; परंतु त्याचा राग येऊन चार तरुणांनी त्या नातेवाइकांनाही मारण्यास सुरुवात केली. रेल्वे पोलिसांनी यात मध्यस्थी केली आणि त्या मारहाण करणाऱ्या चार जणांना गाडीतून खाली उतरवले. या प्रकारामुळे वेळेवर आलेली नेत्रावती एक्स्प्रेस सुमारे एक तास खोळंबली होती. कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर परराज्यातील प्रवासी दादागिरी करत असल्याचे प्रकार घडतात. दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी बंद झाल्यानंतर पनवेल येथून रत्नागिरीत येणाऱ्या प्रवाशांना इतर गाड्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे इतर गाड्यांतील जनरल डब्यातून कोकणी जनतेला प्रवास करावा लागत आहे. पनवेल येथून सुटलेली नेत्रावती एक्स्प्रेस या गाडीत जनरल डब्यात पुढे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. ते अगोदरच जागा अडवून कोकणी प्रवाशांना दमदाटी करतात. अशावेळी कोकणातील प्रवाशांनी आवाज उठविला तर त्यांनाच मारहाण करण्यात येते, असे वारंवार घडत असते. मात्र, आजचा प्रकार चार प्रवाशांनी खेडमधील एका प्रवाशाला केलेल्या मारहाणीमुळे उघडकीस आला.
या प्रकरणातील त्या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मगच नेत्रावती एक्स्प्रेस गाडी पुढे सोडण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.