Tuesday, June 2, 2026
spot_img
Home संगमेश्वर निवे बुद्रुक येथे डंपरला वॅगनआरची पाठीमागून धडक; नमन कलाकाराचा मृत्यू

निवे बुद्रुक येथे डंपरला वॅगनआरची पाठीमागून धडक; नमन कलाकाराचा मृत्यू

चार जण गंभीर जखमी

देवरुख:- देवरुख-रत्नागिरी मार्गावरील निवे बुद्रुक येथे सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका नमन कलाकाराचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला वॅगनआर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त सर्वजण नमन कलाकार असून ते सायले येथे झालेला नमन कार्यक्रम आटोपून निवळीच्या दिशेने परतत होते. सोमवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची पांढऱ्या रंगाची वॅगनआर कार (क्र. एमएच ०२ जेपी ९४९३) निवे बुद्रुक परिसरात पोहोचली असता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला (क्र. एमएच ०८ जी १५५९ ) पाठीमागून जाऊन जोरदार धडकली.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. धडकेचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे कारमधील काही प्रवासी वाहनात अडकून पडले होते. ग्रामस्थ सचिन विभुते, राजू ताम्हणकर, उमेश ताम्हणकर, संतोष सांडिम तसेच इतर नागरिकांनी प्रसंगावधान राखत जखमींना वाहनातून बाहेर काढले. काही जण डंपरच्या मागील भागात अडकले असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच ‘भगवान महादेव सांबरे रुग्णवाहिका’ सेवेचे चालक मनोज पांचाळ यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

या अपघातात एका नमन कलाकाराचा जागीच मृत्यू झाला. वृत्त लिहिपर्यंत मृत व्यक्तीची ओळख अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नव्हती. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी काहींना पुढील उपचारांसाठी अन्यत्र हलविण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग तसेच इतर बाबींचा तपास सुरू असून पुढील चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अपघातानंतर क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी धावून गेलेल्या ग्रामस्थांनी जखमींचे प्राण वाचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच रुग्णवाहिका चालक मनोज पांचाळ यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले. परिसरात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.