Sunday, June 14, 2026
spot_img
Home मंडणगड निवळी नदीपात्रात आढळला अनोळखी मृतदेह

निवळी नदीपात्रात आढळला अनोळखी मृतदेह

मंडणगड:- तालुक्यातील सुर्ले येथील निवळी नदीपात्रात एका अंदाजे ४५ ते ५५ वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ११ जून रोजी सकाळी उघडकीस आली असून, पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग दशरथ जाधव हे आपल्या कुटुंबासह मासे पकडण्यासाठी सुर्ले येथील निवळी नदीपात्रात गेले होते. नदीत पाणी कमी असल्याने ते मासे पकडण्यात व्यस्त असताना, त्यांच्या सोबत असलेल्या कुत्र्याने नदीच्या बाजूला असलेल्या झुडपांकडे पाहून भुंकण्यास सुरुवात केली. कुत्र्याचे संशयास्पद वर्तन पाहून पांडुरंग जाधव यांनी त्या दिशेने जाऊन पाहिले असता, त्यांना तिथे एक मृतदेह पडलेला दिसला. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता आणि त्यावर माश्या घोंगावत होत्या.

सदर धक्कादायक प्रकार पाहून पांडुरंग जाधव यांनी त्वरित भिंगळोलीचे पोलीस पाटील संतोष मळेकर यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर भिंगळोली आणि सुर्ले येथील पोलीस पाटलांनी खात्री करून घेतली आणि या घटनेची माहिती मंडणगड पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत व्यक्ती पुरुष असून त्याचे वय अंदाजे ४५ ते ५५ वर्षे असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. मात्र, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. मंडणगड पोलीस सध्या परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेत असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेचा अधिक तपास मंडणगड पोलीस करत आहेत.