Saturday, August 1, 2026
spot_img
Home रत्नागिरी निवळीत घरासमोरील पायऱ्यांवर तरुणाचा मृत्यू

निवळीत घरासमोरील पायऱ्यांवर तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरालगतच्या निवळी बौद्धवाडी येथे दारूच्या व्यसनामुळे एकाकी राहत असलेल्या तरुणाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना घडली. घरासमोरील पायऱ्यांवर तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी ३१ जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार ३१ जुलै रोजी सकाळी ६:४५ ते १०:५५ या वेळेत घडला. मृत तरुणाचे नाव आशिष अनंत सावंत (वय ४४, रा. निवळी बौद्धवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे आहे.

​याप्रकरणी मयताचे काका संतोष गोपाळ सावंत यांनी पोलिसात खबर दिली आहे. संतोष सावंत हे निवळी ग्रामपंचायतीमध्ये पाणी सोडण्याचे काम करतात. ३१ जुलै रोजी सकाळी ६:३५ वाजता ते विहिरीवरील पाण्याचा पंप चालू करून ६:४५ वाजेच्या सुमारास परत येत असताना, त्यांचा पुतण्या आशिष हा घरासमोरील पायऱ्यांवर पाय व जमिनीवर डोके अशा उताणे स्थितीत पडलेला त्यांना दिसला.

त्यांनी आशिषला हाक मारली, परंतु त्याची कोणतीही हालचाल झाली नाही. त्यानंतर त्यांनी तातडीने वाडीतील लोकांना, पोलिसांना व पोलीस पात्राला या घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांच्या मदतीने आशिषला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून आशिष अनंत सावंत याला मृत घोषित केले.

​या प्रकरणी आमू. क्रमांक ६९/२०२६ (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४) अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.