Saturday, November 7, 2026
spot_img
Home राजकीय ना. उदय सामंत यांच्या बैठकीकडे काही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची पाठ

ना. उदय सामंत यांच्या बैठकीकडे काही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची पाठ

अधिकार काढून घेण्यासाठी मला एक मिनिटही लागणार नाही; उदय सामंत यांचा सज्जड दम

रत्नागिरी:- विशेष कार्यकारी अधिकारी हे मानाचे पद आहे; मात्र या पदाचा गैरवापर करून स्वतःला मोठे शासकीय अधिकारी समजण्याची चूक करू नका. जनतेची कामे न करणाऱ्या तसेच महत्त्वाच्या बैठकांना गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे अधिकार काढून घेण्यासाठी मला एक मिनिटही लागणार नाही, असा सज्जड दम जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. काही नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याबद्दल सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शिवसेना पक्षाच्यावतीने आयोजित विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत स्पष्ट भूमिका मांडत प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपल्या कामाचा वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

निवडणुकीच्या काळात पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळावा, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध दाखले आणि कागदपत्रांच्या प्रती मिळवताना होणारा त्रास कमी व्हावा, या उद्देशाने विशेष कार्यकारी अधिकारी हे पद देण्यात आले आहे. मात्र, काही नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याबद्दल सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने पाच वर्षांच्या कार्यकाळात दरवर्षी नेमके कोणती कामे केली, याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. घराघरांत जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेणे, त्यांच्या समस्या सोडवणे आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही जबाबदारी त्यांनी पार पाडावी. या कामांचा वार्षिक अहवाल सादर करणेही बंधनकारक असेल, असे सामंत यांनी सांगितले.
केवळ पदाचा गैरवापर करून पक्षाची किंवा पदाची बदनामी करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. जुन्या प्रलंबित याद्यांमधील कामे पूर्ण करून नवीन कार्यकर्त्यांनाही संधी आणि न्याय दिला जाईल. विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा उपयोग पक्षवाढीसोबतच जनसामान्यांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.