Monday, October 12, 2026
spot_img
Home राजापूर नाणार खाडीत बुडालेल्या ३ बालकांवर अंत्यसंस्कार, चौथ्या मुलीचा शोध सुरू

नाणार खाडीत बुडालेल्या ३ बालकांवर अंत्यसंस्कार, चौथ्या मुलीचा शोध सुरू

राजापूर:- नाणार इंगळवाडी येथील खाडीपात्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या भाटकर कुटुंबातील तीन बालकांचा सोमवारी सकाळी शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. रविवारी रात्री उशिरा शोधमोहिमेदरम्यान या तिघांचे मृतदेह हाती लागले होते. दरम्यान, या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या माहिरा जुनेद भाटकर (वय १५) या मुलीचा शोध अद्याप लागलेला नसून, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांकडून तिचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे नाणार इंगळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

रविवारी दुपारी नाणार इंगळवाडी येथील खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी गेलेल्या जुनेद भाटकर यांच्या कुटुंबातील पाच मुले खोल पाण्यात बुडाली होती. खाडीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. यावेळी एका मुलीला वाचवण्यात यश आले; मात्र अन्य चार बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरू करण्यात आलेल्या शोधमोहिमेत रविवारी रात्री उशिरा मोहम्मद जुनेद भाटकर (वय ६), जुहेरिया जुनेद भाटकर (वय ९) आणि बुशिरा जुनेद भाटकर (वय ११) या तीन बालकांचे मृतदेह आढळून आले.

सोमवारी सकाळी नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत तिन्ही बालकांचा दफनविधी पार पडला. लहानग्यांच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अंत्यविधीच्या वेळी उपस्थितांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. एकाच कुटुंबातील तीन चिमुरड्यांना अशा प्रकारे निरोप द्यावा लागल्याने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.

दरम्यान, दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या माहिरा जुनेद भाटकर हिचा शोध सोमवारी सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आला. नाटे सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक, स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार खाडीपात्रात शोधमोहीम राबवत आहेत. पाण्याचा प्रवाह आणि खाडीची खोली यांमुळे शोधकार्यात अडचणी येत असल्या, तरी बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आपल्या डोळ्यांसमोर मुलांना खाडीत बुडताना पाहण्याची वेळ आल्याने जुनेद भाटकर आणि त्यांची पत्नी हिना भाटकर यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. तीन बालकांच्या मृत्यूने आणि चौथ्या मुलीच्या बेपत्ता असण्याने भाटकर कुटुंबावर दुःखाचा असह्य प्रसंग ओढवला आहे. या हृदयद्रावक दुर्घटनेने नाणार इंगळवाडी परिसरातील वातावरण सुन्न झाले असून, बेपत्ता मुलीचा शोध लागण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.