नाटे येथे १२ तासांत चोरीचा छडा; दोन आरोपी ताब्यात

१.४७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; तपास पथकाचे उल्लेखनीय यश

राजापूर:- सागरी पोलीस ठाणे नाटे यांनी अवघ्या १२ तासांच्या आत मच्छिमारीच्या जाळ्यातील शिसे चोरीचा छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १,४७,२०० रु. किमतीचे तब्बल ४६० किलो वजनाचे शिसे हस्तगत केले असून, या चोरीत सहभागी असलेल्या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या जलद कारवाईमुळे किनारी भागातील नागरिकांमध्ये विशेषतः मच्छिमार समुदायात मोठा दिलासा मिळाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे कातळी सडा, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे ही चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी सागरी पोलीस ठाणे नाटे येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रारदार नासिर मजगावकर (वय ४७, रा. कातळी) यांनी तक्रार दिली की, पर्सनेट मच्छिमारीचे जाळे दुरुस्तीसाठी आणून कातळी सडा येथील एका कंपाऊंडमध्ये झाकून ठेवले होते. १६ सप्टेंबर २०२५ रोजी तपासणी केली असता जाळ्यातील सुमारे ६४० किलो वजनाचे शिसे चोरीस गेल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रार प्राप्त होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तातडीने तयार करण्यात आले. पथकाने तपासादरम्यान तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करत आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला.

केवळ १२ तासांच्या कसून तपासानंतर, पोलिसांनी तातडीने मुबिन अब्दुल सत्तार सोलकर (वय ३०, रा. धालवली मुस्लिमवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) आणि समिर कुदबुद्दिन सोलकर (रा. कातळी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १,४७,२०० रु. किमतीचे (४६० किलो वजनाचे) पर्सनेट मच्छिमारी जाळ्याचे शिसे जप्त केले. या शिसेचा दर प्रति किलो २३० रु. प्रमाणे होता.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी यापूर्वी गुन्हेगारी तपासाचा जो अनुभव व तांत्रिक माहितीचा सखोल वापर केला होता, त्याचा उपयोग या प्रकरणात प्रभावीपणे झाला. त्यांच्या कुशल तपासकौशल्यामुळे आणि योग्य दिशेने मार्गदर्शनामुळे हा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाडे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, तसेच पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपास पथकात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय झगडे यांच्यासह पो.कॉ. पाटील, पो.कॉ. जाधव, पो.कॉ. कुसाळे व पो.कॉ. बांदकर (क्र. १५७८) यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सदर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय झगडे हे करीत आहेत.

किनारी भागातील मच्छिमार व नागरिकांनी सागरी पोलीस ठाण्याच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे मनापासून कौतुक केले आहे. चोरीस गेलेला महत्त्वाचा मुद्देमाल पूर्णपणे हस्तगत झाल्यामुळे मच्छिमार समुदायात दिलासा पसरला असून पोलिसांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होण मदत होणार आहे.