रत्नागिरी:- शहराजवळील नाचणे, गोडाऊन स्टॉप येथे राहणाऱ्या एका ३७ वर्षीय तरुणाचा पोटदुखीच्या आजाराने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. राजेश विश्वनाथ यादव (रा. गोडाऊन स्टॉप, साई मंदिराच्या बाजूला, नाचणे, मूळ रा. संतकबीर नगर, उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना २९ डिसेंबर रोजी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश यादव यांना गेल्या तीन दिवसांपासून पोटात दुखणे आणि लघवीचा त्रास होत होता. २८ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पोटात जास्त दुखू लागले आणि त्यांचे डोळे पिवळे पडल्याचे निदर्शनास आले. त्यांची प्रकृती बिघडल्याचे पाहून त्यांचे सहकारी जनार्दन रामकेस कुमार यांनी त्यांना तातडीने रिक्षाने रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनव जाधव यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक १४७/२०२५ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.









