नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी तरुणाने संपवले जीवन

दाभोळ, दालभेश्वर पाखाडी येथील घटना

दापोली:- दापोली तालुक्यातील दाभोळ, दालभेश्वर पाखाडी येथे एका २६ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकाश अरुण येद्रे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, दालभेश्वर पाखाडी येथे आकाश येद्रे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. २३ फेब्रुवारीच्या रात्री ९ ते २४ फेब्रुवारीच्या पहाटे १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आकाशने घराच्या एका खोलीतील लोखंडी भालाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. आकाशची आई जेव्हा त्या ठिकाणी गेली, तेव्हा तिला आपला मुलगा लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी तात्काळ आरडाओरडा केल्यावर फिर्यादी रवींद्र नवजेकर आणि इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

​घटनेनंतर तात्काळ खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती आकाशला मृत घोषित केले. आकाशने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

​या घटनेची खबर मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. २४ फेब्रुवारी रोजी पहाटे ५:१३ वाजता या प्रकरणी पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.