Wednesday, October 14, 2026
spot_img
Home चिपळूण नदीच्या पुलाखाली सापडले मोबाईल अन् बॅग; तरुण बेपत्ता प्रकरणी अपहरणाचा संशय

नदीच्या पुलाखाली सापडले मोबाईल अन् बॅग; तरुण बेपत्ता प्रकरणी अपहरणाचा संशय

चिपळूण कळंबस्ते नाका परिसरातील घटना

चिपळूण:- तालुक्यातील कळंबस्ते नाका परिसरात ३३ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. विकास सिद्धार्थ जाधव असे या तरुणाचे नाव असून, त्याची काळ्या रंगाची सॅक, मोबाईल आणि अन्य साहित्य आढळून आले आहे. नातेवाइकांनी परिसरात तसेच परिचितांकडे शोध घेऊनही तो सापडला नसल्याने त्याचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकास सिद्धार्थ जाधव (वय ३३, मूळ रा. तळसर, वरची बौद्धवाडी, ता. चिपळूण; सध्या खेर्डी येथे वास्तव्यास) हा ११ ऑक्टोबर २०२६ रोजी कळंबस्ते नाका येथील इंदिरा वेल्डिंग वर्क्सच्या शेजारी, वाशिष्ठी नदीपात्रालगत पुलाखालील भागात असताना बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्याची काळ्या रंगाची सॅक, मोबाईल आणि इतर साहित्य मिळून आले. त्यानंतर फिर्यादी शशिकांत शंकर कवडे (वय ६०, व्यवसाय शेती, रा. अडरे, बौद्धवाडी, ता. चिपळूण) तसेच अन्य नातेवाइकांनी आजूबाजूच्या परिसरात आणि नातेवाइकांकडे त्याचा शोध घेतला. मात्र, विकासचा ठावठिकाणा लागला नाही. विकासचा शोध घेऊनही तो मिळून न आल्याने त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गुप्तपणे आणि गैरकायदेशीररीत्या रोखून ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण केले असावे, असा संशय फिर्यादींनी व्यक्त केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

विकास जाधव बेपत्ता होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचे साहित्य घटनास्थळी आढळल्याने या प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, अपहरण झाल्याची बाब अद्याप तपासातून सिद्ध झालेली नसून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. बेपत्ता तरुणाचा शोध आणि घटनेमागील नेमके कारण उघड होण्याकडे आता लक्ष लागले आहे.