रिक्षातील दोघे जखमी; २३ प्रवासी थोडक्यात बचावले
संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून मंगळवारी रात्री धामणी रेल्वे स्टेशनजवळ एका खासगी लक्झरी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाले असून सुदैवाने बसमधील २३ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. बस रस्ता सोडून थेट बाजूच्या दरडीवर आदळल्याने एक मोठा अनर्थ टळला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास रिक्षा क्रमांक एम एच ०८ बी सी २०३५ ही रेल्वे स्टेशनकडून संगमेश्वरच्या दिशेने येत होती. याच वेळी विजयदुर्ग येथून २३ प्रवासी घेऊन मुंबईच्या दिशेने जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच ०१ ई एल ५४९५ ही आपल्या मार्गावरून जात असताना हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या रिक्षाला वाचवण्याच्या नादात बस चालकाचा ताबा सुटला आणि बस रिक्षाला जोरदार धडक देऊन थेट रस्त्याशेजारील गटारात उतरली. सुदैवाने रस्त्याच्या बाजूला दरड असल्याने बस त्यावर आदळून थांबली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
अपघाताचा आवाज इतका भीषण होता की परिसरात घबराट पसरली. बसचा मुख्य दरवाजा उघडणे शक्य नसल्याने स्थानिकांनी प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढले. या अपघातात रिक्षाचालक अभिजित संजय गमरे आणि प्रवासी कुणाल सुरेंद्र कांबळे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी रक्ताचे सडे पडले होते, यावरून धडकेची तीव्रता लक्षात येत होती. जखमींना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला.
या अपघातानंतर महामार्गावरील कंत्राटदाराच्या कामाबद्दल प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रात्रीच्या वेळी महामार्गावर दिशादर्शक फलक आणि डायव्हर्जन बोर्ड स्पष्टपणे दिसत नसल्याने चालकांचा गोंधळ उडत आहे. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले,
मात्र त्यापूर्वीच पत्रकार वहाब दळवी आणि राजू पटेल यांनी स्थानिकांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम केले. बस चालक मुस्तफा राजासाब गारमपल्ली हा देखील या घटनेत थोडक्यात बचावला असून संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









