द यश फाऊंडेशनकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाचा आरोप

रत्नागिरी:- द यश फाऊंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग मेडिकल रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये जीएनएम अभ्यासक्रमासाठी 30 विद्यार्थ्यांची क्षमता असताना सन 2021 या शैक्षणिक वर्षात तब्बल 47 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन 17 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष फुकट गेले आहे. वार्षिक दीड लाख रुपये फी घेऊन महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी फसवणूक केली आहे. याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संस्थाचालक व विद्यार्थी यांची बैठक होणार असल्याची माहिती भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मनिष जाधव, मार्गदर्शक अमोलकुमार बोधिराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यश फाऊंडेशनच्या नर्सिंग कॉलेजमार्फत विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. ज्या सुविधा दिल्या जात नाहीत त्याचे भरमसाट शुल्क आकारले जाते. उपस्थित कर्मचारीवर्ग विद्यार्थ्यांशी उद्धटपणे वागतो तर संस्थाचालकांचे दर्शन विद्यार्थ्यांना अद्यापही झालेले नसल्याचे श्री.बोधिराज यांनी सांगितले.
सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी 30 विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक असताना महाविद्यालयाने 47 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर केवळ 30 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. उर्वरित 17 विद्यार्थी प्रत्यक्षात महाविद्यालयात शिक्षण घेत असले तरीही त्यांना शासनाच्या अंतिम परीक्षेत बसविले जाणार नसल्याचे माहीत असून सुद्धा महाविद्यालयाने त्यांच्याकडून शैक्षणिक शुल्क, हॉस्टेल फी, मेस फी असे सुमारे दीड लाख रुपये घेतले. ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नव्हती त्या विद्यार्थ्याच्या घरी वसुलीसाठी महाविद्यालयाने माणसे पाठविली होती. असे असताना आजही 17 विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्याने त्यांचे चालू शैक्षणिक वर्ष फुकट गेले असून या विद्यार्थ्यांना सन 2023 मध्ये परीक्षेला बसविले जाईल असे महाविद्यालयाने सांगितले आहे. सन 2023 मध्ये पहिले वर्ष पूर्ण होणार असेल तर सध्या शिक्षण घेत असलेली दोन वर्षे फुकट गेली. या कालावधीत बँकेतून कर्ज घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दोन वर्षांचे अतिरिक्त व्याज भरावे लागणार असून याला केवळ संस्थाचालक जबाबदार असल्याचा आरोप श्री.बोधिराज यांनी केला.

हॉस्टेलची फी घेऊन विद्यार्थिनींना संस्थाचालक टीआरपी येथील लॉजवर वास्तव्याला ठेवत होते. परंतु त्या लॉजचेही भाडे न दिल्याने लॉज मालकाने विद्यार्थ्यांना बाहेर काढले, अशी अवस्था यश फाऊंडेशनची आहे. विद्यार्थ्यांची मेस महाविद्यालयात असून त्यांना रात्रीचे जेवण सायंकाळी 5 वाजता डब्यात भरून दिले जाते. शिळ्या जेवणात अळ्या सापडल्याने विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले होते ही वस्तुस्थिती आहे. अशा या महाविद्यालयावर कायदेशीर कारवाई करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष फुकट जाऊ नये याची दक्षता प्रशासन व शासनाने घ्यावी अशी मागणी विद्यार्थी संघाने केली. यावेळी पत्रकार परिषदेला बसपाचे प्रदेश सचिव राजेंद्र आयरे, दिपिका आग्रे, सुप्रिया मोहिते यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.