Saturday, May 16, 2026
spot_img
Home संगमेश्वर दोन पिकअप गाड्यांची समोरासमोर धडक

दोन पिकअप गाड्यांची समोरासमोर धडक

तळेकांटे येथील अपघातात चालक गंभीर जखमी

संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तळेकांटे येथील बाव नदीच्या पुलाजवळ दोन बोलेरो पिकअप गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. चुकीच्या दिशेने वाहन चालवून समोरून येणाऱ्या गाडीला धडक दिल्याने हा अपघात घडला असून, यामध्ये एक चालक गंभीर जखमी झाला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दिनांक ११ मे रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. आरोपी चालक आशिष प्रदीप खरसे (वय २७, रा. गिर्ये, देवगड) हा आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप (MH-07-AJ-4754) घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. तळेकांटे येथील बाव नदीच्या पुलाजवळ महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूक एकमार्गी सुरू आहे.

रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता आरोपीने आपले वाहन हयगयीने आणि बेदरकारपणे चालवत चुकीच्या बाजूला नेले. यावेळी समोरून गोवा दिशेकडून येणाऱ्या दुसऱ्या बोलेरो पिकअपला (MH-08-H-7929) त्याने उजव्या बाजूने जोरात धडक दिली.

​या भीषण धडकेत समोरून येणाऱ्या पिकअपचा चालक चंद्रशेखर तारासिंग जाधव (वय ४०) हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच गाडीतील साक्षीदार राज जाधव यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

​याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदेश सिताराम जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी चालक आशिष खरसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.