मार्गताम्हाणे खुर्द पैकी सुतारवाडी येथे बचाव मोहीम
चिपळूण:- येथील मौजे मार्गताम्हाणे खुर्द पैकी सुतारवाडी येथे विहिरीत पडलेल्या एका दुर्मिळ पिसोरी हरणाची वन विभागाच्या बचाव पथकाने यशस्वीरीत्या सुटका केली. ही घटना रविवारी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुतारवाडी येथील रहिवासी प्रताप सुर्वे यांच्या आंबा-काजू बागेतील विहिरीमध्ये एक वन्यप्राणी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती वन विभागाचे एस. एस. सावंत, वनपाल चिपळूण यांना दिली.
माहिती मिळताच वन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये श्री. सावंत यांच्यासह वनरक्षक राहुल गुंठे, श्री. कृष्णा इरमले व आरआरटी टीमचे सदस्य अथर्व घाग यांचा समावेश होता. विहिरीत पडलेला प्राणी हा ससा नसून दुर्मिळ पिसोरी हरण असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पिसोरी हरणाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने प्रयत्न सुरू केले. हरणाने विहिरीत उडी मारून पोहण्यास सुरुवात केली होती. तरीही, बचाव पथकाने जाळीच्या साहाय्याने त्याला सुरक्षितपणे पकडून बाहेर काढले. त्याची वैद्यकीय आणि शारीरिक तपासणी केल्यानंतर ते सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
या बचावकार्यात विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांचे मार्गदशन मिळाले. वन विभागाच्या या यशस्वी कारवाईमुळे दुर्मिळ पिसोरी हरणाचा जीव वाचला आहे.









