चिपळूण नगर परिषदेत २०१९ मध्ये घडला होता प्रकार
चिपळूण:- दिव्यांगांच्या ५ टक्के अनुदानातील घरकुल उभारणी योजनासाठीच्या निधीचा दुरुपयोग करून एका महिलेने चिपळूण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची ३ लाख २४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १८ सप्टेंबर २०१९ रोजी घडला. या प्रकरणी शनिवारी त्या महिलेवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद चिपळूण नगर परिषदेतील सफाई कामगार संतोष शांताराम मोहिते (५०, रॉयलनगर, चिपळूण) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने चिपळूण नगर परिषदेने दिव्यांग ५ टक्के अनुदानातून निःसमर्थ व्यक्तींसाठी राखून ठेवलेल्या वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठीच्या निधीसाठी ३१ जुलै २०१९ रोजी अर्ज केला होता. त्यानुसार त्या महिलेने १८ सप्टेंबर २०१९ रोजी मंजूर झालेली रक्कम स्वीकारली. मात्र प्रत्यक्ष घर न बांधता त्या रकमेचा दुरुपयोग करून नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची ३ लाख २४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे ‘तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.