रत्नागिरी:- परप्रांतीय फास्टर नौकांचा सुळसुळाट होत असल्यामुळे हर्णै येथील मच्छीमारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली असून सहाय्यक मस्य विभागाकडूनही परंप्रांतीय नौकांविरोधात दंड थोपटले आहेत. दाभोळ येथे अठरा वावात मासेमारी करणारी कर्नाटकची नौका जप्त केली आहे. त्यावर सुमारे 36 हजार रुपयांची मासळी होती.
शनिवारी (ता. 8) दुपारच्या सुमारास दाभोळ किनार्यापासून सुमारे 18 ते 20 वावात एक नौका मासेमारी करत असल्याची माहिती मिळाली. अनधिकृतपणे जिल्ह्याच्या हद्दीत कर्नाटक येथील ’जॉन लोरन्स’ ही नौका मासेमारी करत होती. मत्स्य विभागाच्या पथकाने त्या नौकवर कारवाई केली. नौका जप्त करुन दाभोळ बंदरात आणून ठेवण्यात आली आहे. त्या नौकवरील मासळीचा लिलाव करण्यात आला असून त्यामधून 35 हजार 550 रुपये मिळाले. ही रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी दीप्ती आस्वाद साळवी आणि सागरी सुरक्षा रक्षक योगेश तोस्कर यांनी केली.
परप्रांतीय फास्टर नौकांच्या त्रासामुळे स्थानिक मच्छीमारांनी दापोलीत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. फास्टर नौका मासेमारी करुन पळून जातात. झुंडीने असलेल्या त्या नौका स्थानिक नौकांचे नुकसान करत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. मत्स्य विभागाकडून या विरोधात कडक धोरण अवलंबण्यात आले आहे. जप्त केलेल्या नौकेचे प्रकरण तहसिलदारांपुढे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येईल. त्यांना पाच पट दंड बसण्याची शक्यता आहे. भविष्यात परप्रांतीय मच्छीमारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.









