Sunday, November 15, 2026
spot_img
Home दापोली दापोलीत फटाक्यामुळे लागलेल्या आगीत दोन लाखांचे नुकसान

दापोलीत फटाक्यामुळे लागलेल्या आगीत दोन लाखांचे नुकसान

फर्निचर मार्टचे दोन लाखांचे नुकसान

दापोली:- शहरातील पोस्टाची आळीतील सुर्वे कंपाऊंड येथे ठेवलेल्या किशोर फर्निचर मार्टच्या सामानावर फटाका पडून लागलेल्या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. याठिकाणी जवळपास २२ फ्रीज आणि ३ वॉशिंग मशीन असे साहित्य होते. परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.

दिवाळीच्या कालावधीत किशोर फर्निचर मार्टने एक्सचेंज योजनेंतर्गत फ्रिज घेतले होते. आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा सुरु केला. लगतच्या विहिरीला पंप लावून पाणी उपसा करण्यात आला. जालगाव येथील धोपट यांचा पाण्याचा टँकरही तातडीने घटनास्थळी दाखल झाला. टँकरच्या साहाय्याने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान, दापोली नगरपंचायतीची मोटारसायकलवरील अग्निशमन यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली. मात्र तोपर्यंत नागरिकांच्या प्रयत्नांतून आग विझवण्यात यश आले होते. या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिनेश जैन यांनी दिली.