दापोलीत अपंग व्यक्तीला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा

दापोली:- तालुक्यातील जालगाव रोहीदासवाडी येथे एका अपंग व्यक्तीला वारंवार मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंगेश गंगाराम जालगावकर (५०, रा. जालगाव) हे चार वर्षांपूर्वी मोटार अपघातात अपंग झाले आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींना याची माहिती असूनही त्यांनी फिर्यादीला शारीरिक व मानसिक त्रास दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश गंगाराम जालगावकर, आशा गंगाराम जालगावकर, ऐश्वर्या मंगेश जलगावकर, चारुशिला मंगेश जालगावकर, मयूर मंगेश जालगावकर, राजाराम रामा जालगावकर आणि प्रमोद काशिनाथ जालगावकर (सर्व रा. रोहीदासवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मंगेश जालगावकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ५ मार्च रोजी आरोपी सुरेश जालगावकर, आशा जालगावकर, ऐश्वर्या जलगावकर, चारुशिला जालगावकर, मयूर जालगावकर यांनी त्यांच्या पत्नीला मारहाण करून शिवीगाळ केली. यापूर्वी, १ मे २०२४ रोजी फिर्यादीचे भाऊ असलेले आरोपी सुरेश जालगावकर, मयूर मंगेश जालगावकर यांनी त्यांना मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली होती. तसेच, ८ मार्च २०२५ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास वरील 5 जणांनी पुन्हा मंगेश जालगावकर यांना मारहाण करून शिवीगाळ केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याव्यतिरिक्त, आरोपी राजाराम जालगावकर आणि प्रमोद जालगावकर यांनी सन २०२४ मध्ये दसऱ्याच्या सणाच्या वेळी सार्वजनिक प्रसादाला बसले असताना फिर्यादीला ‘तू लंगडा आहेस, तू निघून जा’ असे बोलून अपमानित केले. फिर्यादीने आरोप केला आहे की, आरोपींनी त्यांना वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.

याप्रकरणी दापोली पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपंग व्यक्तीचे हक्क अधिनियम २०१६ चे कलम ९२ (अ) (ब) (क) आणि भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११५ (२), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.