दहा हजारांची लाच घेताना चाफेतील तलाठी एसीबीच्या जाळ्यात

रत्नागिरी:- जमिनीच्या ७/१२ उताऱ्यामध्ये फेरफार करून नाव दाखल करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चाफे (ता. रत्नागिरी) येथील ग्राम महसूल अधिकाऱ्याला (तलाठी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बजरंग दत्तात्रय चव्हाण (वय ५१) असे या लोकसेवकाचे नाव असून, ही कारवाई नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, १ जानेवारी रोजी चाफे तलाठी कार्यालयात करण्यात आली.

तक्रारदार यांनी रत्‍नागिरी तालुक्यातील आगरनरळ येथे १० गुंठे बिनशेती क्षेत्र खरेदीखताद्वारे खरेदी केले होते. या खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार करून स्वतःचे नाव लावण्यासाठी तक्रारदारांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी तलाठी कार्यालय चाफे येथे अर्ज केला होता. हा अर्ज स्वीकारून फेरफार नोंद करून नाव दाखल केलेला ७/१२ उतारा आणि फेरफारची प्रत देण्यासाठी तलाठी बजरंग चव्हाण यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याप्रकरणी ३१ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याकडे तक्रार नोंदवली होती.

​मिळालेल्या तक्रारीनुसार, १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान तलाठी चव्हाण यांनी १० हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम तातडीने स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर पथकाने चाफे येथील कार्यालयात सापळा रचला. पंचांच्या समक्ष तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताना बजरंग चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले. बजरंग दत्तात्रय चव्हाण हे (सध्या ओम शांती अपार्टमेंट, नाचणे रत्नागिरी) येथे राहतात, तर त्यांचे मूळ गाव कोणेगांव ता. कराड, जि. सातारा आहे.

​ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीच्या पथकाने केली. यामध्ये पोलीस निरीक्षक मच्छिद्र जाधव, सहाय्यक फौजदार उदय चांदणे, पोलीस हवालदार दीपक आंबेकर, श्रेया विचारे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार, समिता क्षीरसागर आणि वैशाली धनवडे यांचा समावेश होता.