देवरुख:- फसवणूक आणि बनावट
कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा फरार आरोपी गुरुवारी देवरुख पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पनवेल येथून या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तेजस किबदीयानी असे या आरोपीचे नाव आहे.
तेजस या अटक करून शुक्रवारी देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीशांनी जामिनावर मुक्तता केली.
तीन वर्षांपूर्वी तेजसवर देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६४, ४६७, ४७१ आणि ३४ अन्वये गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो पसार होता. वारंवार च्काण बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. तेजस किबदीयानी हा सध्या पनवेल परिसरात वावरत असल्याची गोपनीय माहिती देवरुख पोलिसांना मिळाली.
पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक त्याच्या मागावर गेले. या पथकात पोलीस हवालदार सचिन कामेरकर, संजय करांडे, सचिन लगारे यांचा समावेश होता. गुरुवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास तेजसला पनवेल येथून ताब्यात घेतले. या कामगिरीबद्दल देवरुख पोलिसांचे कौतुक होत आहे.









