टँकर चालकावर गुन्हा दाखल
गुहागर:- गुहागर तालुक्यातील आबलोली-तवसाळ मार्गावर भरधाव वेगातील डिझेल टँकर उलटून झालेल्या अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघजण जखमी झाले आहेत. हा अपघात ४ मार्च २०२६ रोजी दुपारी २:१५ वाजण्याच्या सुमारास तवसाळ गावातील अशोका बिल्डकॉन कंपनीजवळ घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप डिझेल टँकर (क्रमांक RJ-47-GA-8386) घेऊन चालक मेहेरतेज दिवाकर गुडेला (रा. विरार, पालघर) हा तवसाळच्या दिशेने जात होता. अशोका बिल्डकॉन कंपनीपासून १०० मीटर अंतरावर असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि स्टेरिंग अचानक डाव्या बाजूला फिरल्याने टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
या अपघातात टँकरमध्ये असलेले सुनील संतराम वर्मा (वय २५, रा. बस्ती, उत्तर प्रदेश) यांचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. टँकरमधील इतर कामगार रवींद्र जयंतीलाल यादव (वय ३५), तलत अहमद नूर खान (वय ३०) आणि उपेंद्र श्रीकृष्णानंद यादव (वय २०) हे जखमी झाले आहेत. चालक मेहेरतेज गुडेला यालाही किरकोळ दुखापत झाली आहे. हे सर्वजण सध्या तवसाळ येथील अशोका बिल्डकॉन कंपनीच्या कॅम्पमध्ये वास्तव्यास होते.
या प्रकरणी रवींद्र जयंतीलाल यादव यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टँकर चालक मेहेरतेज गुडेला याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. भरधाव वेगात आणि हयगयीने गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका चालकावर ठेवण्यात आला आहे.









