Sunday, May 24, 2026
spot_img
Home संगमेश्वर तळेकांटे येथे भीषण अपघातात वृध्द गंभीर जखमी

तळेकांटे येथे भीषण अपघातात वृध्द गंभीर जखमी

संगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे काळजाचा थरकाप उडवणारी एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका बेदरकार ट्रकने कारला दिलेल्या जोरदार धडकेत मंडणगड येथील ६६ वर्षीय प्रतिष्ठित व्यापारी दत्तात्रय केशव लेंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून ती रस्त्यावरून उडून थेट डायव्हर्जनच्या पलीकडे फेकली गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय लेंडे हे आपल्या मारुती सुझुकी अल्टो के-टेन कारने (MH 08 AU 5100) रत्नागिरीच्या दिशेने जात होते. तळेकांटे गावच्या हद्दीत आले असता, समोरून येणाऱ्या एका टाटा ट्रकने (KA 22 AA 2947) त्यांच्या कारला चालकाच्या बाजूने प्रचंड वेगात धडक दिली.

अपघातानंतर जखमी दत्तात्रय लेंडे यांचे सुपुत्र दिनेश दत्तात्रय लेंडे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत ४ एप्रिल  रोजी दुपारी १३:२८ वाजता गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालक हनुमंत लक्ष्मण हल्ली (रा. बेळगाव) याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.  पोलीस हेड कॉन्स्टेबल के. आर. सावंत यांनी घटनेची नोंद केली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. एस. जाधव या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
दोन्ही वाहनांचे या अपघातात मोठे नुकसान झाले असून, संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत. महामार्गावर वाढत्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.